शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

का - हानी चे उत्तर कहाणीतच

"एक होते आटपाट नगर, त्या नगरात एक राजा होता आणि एक राणी होती. सर्व प्रजा त्या नगरात खूप सुखी आणि समाधानी होती. राजा सर्वोतोपरी प्रजेची एका पित्या प्रमाणे काळ्जी घेत होता, परंतु राजा आणि राणी त्यांना अपत्य नसल्यामुळे अत्यंत दुःखी होते"

काय मंडळी झालात ना चकीत!

ही अशी आणि अश्या अनेक गोष्टी तर लहानपणा पासूनच ऐकत आणि वाचत आलो आहोत आपण नाही का?

मग आज मी काय वेगळे सांगणार आहे. आज मी कहाणी ची कहाणी माझ्या बाळबोध बुध्दी ला जशी समजली आहे तशी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

माझ्या लहानपणी ची एक गंमत सांगते. माझे आई आणि वडील मला जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट सांगायचे किंवा गोष्टी ची पुस्तकं वाचायला द्यायचे तेव्हा एक गोष्ट मला आवर्जून विचारायचे तुला या गोष्टी मधून काय समजले तू काय बोध घेतलास. आता हे काय कमी होते तर पुढे पुढे आम्ही एखाद नाटक किंवा सिनेमा जरी पहिला तरी तोच प्रश्न त्याहून पुढे तर कहर मालिका पाहिली तरी तोच प्रश्न. मला समजेच ना हे काय  'गोष्ट, सिनेमा किंवा मालिका यामध्ये खोटं खोटं असते ना मग'? (माझ्या बाल मनातील विचार).

त्यावर माझ्या वडिलांनी मला सांगितले 'वाचाल तर वाचाल', ' पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या आणि अशा अनेक नुसत्या म्हणी आणि वाक्प्रचार नसून  आपल्या आयुष्यात आपण एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेताच एखादा विचार, विषय, एखादी योजना, घटना, प्रसंग या बद्दल आपण इत्यंभूत माहिती मिळवू शकतो याची शिकवण आणि जाणीव करून देतात. (परंतु त्यासाठी आपल्याला पुस्तकांशी मैत्री आणि आपल्या आजूबजूच्या प्रत्येक व्यक्तीचे, प्रसंगाचे, आजूबाजूच्या परिसराचे उत्तम आणि डोळस निरीक्षण करणे अत्याश्यक आहे.) (परिक्षण नाही बरं का! परीक्षणात आपण कधी कधी न्यायाधीशांच्या भूमिकेत शिरून न्याय निवाडा करू लागतो म्हणून परीक्षक नाही उत्तम निरीक्षक व्हावे). पण मग यासाठी आपल्याला काय करावे लागेल बरे? तर काहीही नाही प्रत्येक गोष्ट डोळसपणे पाहायला पाहिजे. चौकस बुद्धी ने सारा असारचा विचार करता यायला पाहिजे. एखाद्या प्रसंगाचा किंवा गोष्टी चा हे चूक की हे बरोबर असा निवाडा करता, आपण काय शिकलो असा विचार करता यायला पाहिजे आणि याचीच सवय लागण्यासाठी मला माझे आई आणि वडील प्रत्येक गोष्ट चे तात्पर्य काय? किंवा मला काय बोध झाला असे विचारायचे.

यातूनच मला शिस्त, विचार स्वातंत्र्य, लयबद्ध विचार, आणि निर्णय क्षमता याचे बाळकडूच माझ्या आई आणि वडिलांनकडून मिळाले.

याच स्वतंत्र विचारांमुळे मला उमजलेला गोष्टीतला किंवा कहाणी मधला ट्विस्ट म्हणजे प्रत्येक कहाणी हीच शिकवण देते की जर आपल्या आयुष्यात हानी  टाळायची असेल (चारी अंगाची हानी बर का! ती म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी खांबांवर अवलंबून असणारी) च्या प्रश्नावली कडे तटस्थ पणें पाहून आपली योग्य ती भूमिका घेणं आवश्यक आहे.

प्रत्येक का - हानी चे उत्तर त्याच कहाणीत त्याच्या तात्पर्य मध्ये दडलेले असते.

 

लेखिका - सोनल सुरेश साखरकर

© सोनल सुरेश साखरकर

(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल  करता कृपया मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही नम्र विनंती)

 


२ टिप्पण्या:

का - हानी चे उत्तर कहाणीतच

" एक होते आटपाट नगर , त्या नगरात एक राजा होता आणि एक राणी होती . सर्व प्रजा त्या नगरात खूप सुखी आणि समाधानी होती . र...