शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

का - हानी चे उत्तर कहाणीतच

"एक होते आटपाट नगर, त्या नगरात एक राजा होता आणि एक राणी होती. सर्व प्रजा त्या नगरात खूप सुखी आणि समाधानी होती. राजा सर्वोतोपरी प्रजेची एका पित्या प्रमाणे काळ्जी घेत होता, परंतु राजा आणि राणी त्यांना अपत्य नसल्यामुळे अत्यंत दुःखी होते"

काय मंडळी झालात ना चकीत!

ही अशी आणि अश्या अनेक गोष्टी तर लहानपणा पासूनच ऐकत आणि वाचत आलो आहोत आपण नाही का?

मग आज मी काय वेगळे सांगणार आहे. आज मी कहाणी ची कहाणी माझ्या बाळबोध बुध्दी ला जशी समजली आहे तशी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

माझ्या लहानपणी ची एक गंमत सांगते. माझे आई आणि वडील मला जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट सांगायचे किंवा गोष्टी ची पुस्तकं वाचायला द्यायचे तेव्हा एक गोष्ट मला आवर्जून विचारायचे तुला या गोष्टी मधून काय समजले तू काय बोध घेतलास. आता हे काय कमी होते तर पुढे पुढे आम्ही एखाद नाटक किंवा सिनेमा जरी पहिला तरी तोच प्रश्न त्याहून पुढे तर कहर मालिका पाहिली तरी तोच प्रश्न. मला समजेच ना हे काय  'गोष्ट, सिनेमा किंवा मालिका यामध्ये खोटं खोटं असते ना मग'? (माझ्या बाल मनातील विचार).

त्यावर माझ्या वडिलांनी मला सांगितले 'वाचाल तर वाचाल', ' पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या आणि अशा अनेक नुसत्या म्हणी आणि वाक्प्रचार नसून  आपल्या आयुष्यात आपण एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेताच एखादा विचार, विषय, एखादी योजना, घटना, प्रसंग या बद्दल आपण इत्यंभूत माहिती मिळवू शकतो याची शिकवण आणि जाणीव करून देतात. (परंतु त्यासाठी आपल्याला पुस्तकांशी मैत्री आणि आपल्या आजूबजूच्या प्रत्येक व्यक्तीचे, प्रसंगाचे, आजूबाजूच्या परिसराचे उत्तम आणि डोळस निरीक्षण करणे अत्याश्यक आहे.) (परिक्षण नाही बरं का! परीक्षणात आपण कधी कधी न्यायाधीशांच्या भूमिकेत शिरून न्याय निवाडा करू लागतो म्हणून परीक्षक नाही उत्तम निरीक्षक व्हावे). पण मग यासाठी आपल्याला काय करावे लागेल बरे? तर काहीही नाही प्रत्येक गोष्ट डोळसपणे पाहायला पाहिजे. चौकस बुद्धी ने सारा असारचा विचार करता यायला पाहिजे. एखाद्या प्रसंगाचा किंवा गोष्टी चा हे चूक की हे बरोबर असा निवाडा करता, आपण काय शिकलो असा विचार करता यायला पाहिजे आणि याचीच सवय लागण्यासाठी मला माझे आई आणि वडील प्रत्येक गोष्ट चे तात्पर्य काय? किंवा मला काय बोध झाला असे विचारायचे.

यातूनच मला शिस्त, विचार स्वातंत्र्य, लयबद्ध विचार, आणि निर्णय क्षमता याचे बाळकडूच माझ्या आई आणि वडिलांनकडून मिळाले.

याच स्वतंत्र विचारांमुळे मला उमजलेला गोष्टीतला किंवा कहाणी मधला ट्विस्ट म्हणजे प्रत्येक कहाणी हीच शिकवण देते की जर आपल्या आयुष्यात हानी  टाळायची असेल (चारी अंगाची हानी बर का! ती म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी खांबांवर अवलंबून असणारी) च्या प्रश्नावली कडे तटस्थ पणें पाहून आपली योग्य ती भूमिका घेणं आवश्यक आहे.

प्रत्येक का - हानी चे उत्तर त्याच कहाणीत त्याच्या तात्पर्य मध्ये दडलेले असते.

 

लेखिका - सोनल सुरेश साखरकर

© सोनल सुरेश साखरकर

(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल  करता कृपया मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही नम्र विनंती)

 


मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

माऊली

कोणाला साद घालावी माऊली म्हणून?

आपल्या जन्मदात्या आई आणि वडिलांना? ज्यांनी स्वतः च्या मायेच्या उबदार पंखाखाली एक सुरक्षित जीवन देऊन या जगाशी आपली ओळख करून दिली. एक सुजाण आणि कर्तव्यदक्ष नागरिक होण्याच्या दिशेने आपली योग्य ती जडणघडण केली.

की जो युगे अठ्ठावीस विटेवर उभा आहे त्याला माऊली म्हणावे? जो आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांसाठी एक उर्जास्थान असून भक्त पुंडलिकाच्या मातृ आणि पितृ भक्तीचे माहात्म्य सर्व मनुष्यांना सांगताना मातृ देवो भव पितृ देवो भव ही शिकवण जगाला देत आहे त्याला.

की जगत जननी भवानी मातेला माऊली म्हणावे? जिला ती जगत जननी असूनदेखील निपुत्रिक असण्याचा शाप मिळाला होता एका पौराणिक कथेनुसार कामदेवाची पत्नी रती हिने भगवान शंकर यांच्या तिसऱ्या नेत्रा मुळे भस्म होऊन मृत्युमखी पडलेल्या आपल्या पती कमदेवाच्या वियोगमुळे असा शाप दिला होता. आता हा प्रश्न येतोच ज्या पार्वती मातेला दोन पुत्र आणि एक कन्या आहे ती आणि निपुत्रिक? देवी पार्वती ने कार्तिकेय, श्रीगणेश आणि देवी अशोकसुंदरी यांना स्वतः जन्म नाही दिला. कार्तिकेय मध्ये शंकर पार्वती यांचा अंश आहे पण जन्म मात्र कृतिकानी दिला आहे. सध्याच्या सोप्या भाषेत सांगयचं तर सरोगसी पद्धतीने त्यांचा जन्म झाला. तर श्री विनायका चा जन्म नायका विना (म्हणजेच विना नायक) झालेला आहे म्हणजेच देवी पार्वती यांच्या मळपासून ही कथा तर सर्वश्रुतच आहे. (सध्याच्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी), आणि लहान देवी अशोकसुंदरी राना वनात एकटीच असह्य हिंडताना पाहुन तिच्या बद्दल माया उत्पन्न होऊन देवी पार्वतीनी त्यांना स्वतः बरोबर कैलासावर आणले आणि आपल्या परिवारात स्थान दिले (सध्या च्या काळात याला आपण दत्तक घेणे असे संबोधतो.) आणि अनेक दुष्टांचा सव्हार करून (दुष्ट भावना, विकार आणि विकृती यांचा नाश करून) तिने भूतलावरील तिच्या सर्व लेकरांचे सौरक्षण केले आहे. तर अशी ही जगत जननी साऱ्या जगालाच ही शिकवण देते की आई म्हणजे नुसतीच जन्मदात्री नव्हे तर ती एक उत्कट पण निर्मळ आणि निःस्वार्थी प्रेम भावना आहे जी सदैव आपल्या मुलांना उत्तोत्तम मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवते, त्यांचे रक्षण करते, उत्तम जडण घडण करते

की जगाला ज्ञानामृताचे पसायदान देऊन जनजागृती करणाऱ्या ज्ञानेश्वरांना माऊली म्हणावे

ज्यांच्या अस्तित्वाबद्दल जन्माबद्दल प्रश्न निर्माण करून त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा छळ करणाऱ्या लोकांना त्यांनी मनापासून क्षमा केली आणि आपली काहीच चूक नसताना मनाचे मोठे औदार्य दाखवून क्षमा करून सकारात्मकता म्हणजे काय असते याचे मोठे उदाहरणच त्यांनी जगासमोर ठेवले आहे. प्रासादिक निरूपण आणि पसायदाना च्या स्वरूपात लोककल्याण आणि मानवतेची शिकवणं त्यांनी जनमानसात प्रसारित केली आहे.

 

की लोकसेवा, मानवताधर्म, कर्माचरण, समाजकारण याची शिकवण देणाऱ्या सर्व संत सज्जनांना माऊली म्हणावे

 

की संकटसमयी आपली साथ देणाऱ्या प्रत्येकाला माऊली म्हणावे? अशी अगणित यादीच तयार होईल पण कदाचित हा प्रश्न अनुत्तरीत राहिलं

 

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अश्या अनेक माऊलींची यादी असतेच यामध्ये स्त्री आणि पुरूष असा लिंग भेद असू नये कारण स्त्री असो अथवा पुरूष या पंचमहाभुतिक देहात पंचप्राण सह त्या परमेश्वरानेच ममत्व, प्रिती आणि सारा असाराचा सदविवेक सर्व मनुष्यांना समसमान बहाल केला आहे परंतु त्याचे फळ मात्र आपल्या प्रत्येकाच्या हातात आपल्या स्वतःच्या कर्माचारणावर अवलंबून ठेवले आहे. मग आपण कोण असा भेद करणारे नाही का?

 

मा - माझ्यातील सद्गुणाना प्रोत्साहन देणाऱ्या, माझ्या चुका परखड पणे सांगून योग्य मार्गदर्शन करणाऱ्या

- उराशी कवटाळून माझ्या संकटसमयी माझी साथ देणाऱ्या

ली - लीनता, मानवता, माणुसकी, कर्माचरण याची शिकवण देणाऱ्या

माझ्या आयुष्यातील या सर्व माउलींना माझा मनःपूर्वक सादर प्रणाम 🙏

 

तुम्हां सर्वांच्या शुभ आशिर्वादाने आणि माझ्या छोट्या भावाच्या प्रेरणेमुळे आज प्रथमच हा लेख लिहिण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हा लेख माझ्या आयुष्यातील प्रत्येक माऊलीला समर्पित 🙏

 

 

लेखिका - सोनल सुरेश साखरकर

© सोनल सुरेश साखरकर

(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल करता कृपया मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही नम्र विनंती)

 


का - हानी चे उत्तर कहाणीतच

" एक होते आटपाट नगर , त्या नगरात एक राजा होता आणि एक राणी होती . सर्व प्रजा त्या नगरात खूप सुखी आणि समाधानी होती . र...